Tuesday, October 29, 2019

पुंडलिक भाऊ..

पुंडलिक भाऊ..... धामणगांवातील राहाटगाळ्याच्या व्यस्ततेत एरवी पुंडलिकभाऊ कुणाच्या गावीही नसतो. मात्र उन्हाळा लागला की अनेकांना पुंडलिक भाऊची आठवण होते. दरवर्षी उन्हाळ्यात त्याचा विषय काढला जातो आणि सहजच त्याचा व्यवसाय,त्याचा चांगुलपणा,त्याची मुलं,त्या मुलाचं त्याच्यामुळे झालेलं भलं या गोष्टी आपोआप चर्चेत येतात. पुंडलिक भाऊ आता साठी त झुकलेला आहे. स्थूल शरीरयष्टी,नेहरू शर्ट, पायजमा, पायात स्लीपर आणि डोक्यावर गांधी टोपी,खांद्यावर बागायती रुमाल या पलीकडे दुसरा पेहराव नसणाऱ्या आणि सतत धावपड करणाऱ्या पुंडलिकभाऊला मी लहानपणापासून पाहत आलो आहे. तो साठीत असूनही सारं गाव त्याला 'अरे तुरे' ने हाक मारत आलं आहे. लहान मुलगाही "काय पुंडलिक भाऊ कसा आहे?" असं त्याला म्हणू शकतो एवढं सहज नातं त्याचं गावाशी आहे. कदाचित त्यासाठी त्याचा स्वभाव कारणीभूत असावा. धामणगांवच्या बस स्टॅन्ड ला धरूनच पुंडलिकभाऊची एक छोटीशी आजूबाजूला लाल रंगाची झालर लावलेली चहाची टपरी होती. परंतु उन्हाळ्यात मात्र तो चहाच्या जागी थंडगार मलाई लस्सी, आइसस्क्रीम,ताक ठेवायचा. बसायला लाकडी काळपट मजबूत दोन बाक, दोन टेबल, टेबलावर पाण्याने भरलेले दोन तीन मग, ग्लास. ट्रे मध्ये चार काचेचे ग्लास, एक-दोन भांड्यात लस्सीचे दुधजन्य साहित्य, साखर. गल्ला म्हणून बाजूला ठेवलेली एक छोटीशी लोखंडी पेटी,कोपऱ्या मध्ये गोणपाटात बर्फाच्या लाकडी भुसा टाकलेल्या चार दोन लाद्या आणि त्याला फोडण्यासाठी एक टोच्या हे त्याच व्यावसायिक भांडवल. त्याच्याकडे साधनांची कमतरता होती तरीही धामणगावच्या उन्हात लाही लाही करणारा जीव त्या थंडगार पेयांनी तो तृप्त करायचा. म्हणूनच उन्हाळ्यात पुंडलिक भाऊची आठवण होते, ते याच विशेष कारणाने. माझी शाळा बस स्टॅन्डच्या बाजूलाच होती. बस स्टॅन्ड ची रेल चेल शाळेतून दिसायची. मी सातवीत असतांनाचा हा प्रसंग. एका दिवशी दुपारच्या सुट्टीत आम्ही मुलं बस स्टॅन्ड कडे गेलो असता पाणी पिण्यासाठी पुंडलिक भाऊच्या टपरीत घुसलो. पुंडलिक भाऊ आमच्याकडे पाहत म्हणाला, "लस्सी पिणार का पोरांनो". "आमच्याकडे पैसे नाहीत" "तुम्हांला कोण मागते पैसे ,जेव्हा आले तेव्हा देसाल" असं म्हणत पुंडलिक भाऊने चार हाफ लस्सीचे ग्लास आमच्या हातात दिले. आम्ही आश्चर्य चकित होऊन एकमेकांकडे पाहत त्या थंडगार लस्सीचे ग्लास फस्त केले. अश्या अनपेक्षित धक्क्याची हि पुंडलिक भाऊची आणि माझी पहिली भेट. नंतर तो या- ना त्या कारणाने भेटत राहिला, लस्सीचा आग्रह करीत राहिला. त्याचा हा आग्रह माझ्यासाठी तसेच गावकऱ्यांसाठी नवीन नव्हता. आजही धामणगांवात म्हटलं जाते, पुंडलिक भाऊ जिकडे नजर टाकेल तिकडे त्याची उधारी आहे,एवढ्या लोकांना त्याने चहा,लस्सी वा आइसक्रीम उधारीवर दिली आहे. उधारीवर तो अनेकांची तहान भागवित राहिला. अनेकांनी त्याला फसवले, लुबाडले,गंडविले तरी पैश्यावाचून त्याच्या टपरीतून अतृप्त पोटी कुणी परत गेलं नाही. बाहेरगावच्या ग्राहकांच्या भरोस्यावर तो आपल्या संसारगाडा ओढत होता. नफ्या तोट्याच्या तराजूवर त्याने व्यवसाय कधी केला नाही. कदाचित त्याच्याकडे मारवाडयांसारखा व्यावसायिक दृष्टीकोन नव्हता असंही आपण म्हणू शकतो परंतु असं असले तरी त्याच्यातला 'माणूस' आपल्याला नाकारता येत नाही. एके वर्षी शासनाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत पुंडलिक भाऊची टपरी हटविण्यात आली आणि म्हणावा तसा पुंडलिक भाऊ रत्यावर आला. मात्र हरणे त्याच्या स्वभावात नव्हते. घरच्या दोन एकर जमिनीत तो राबायला लागला. उन्हाळ्यात शेतीत काम नसते म्हणून त्याने सायकलवर मटका गुल्फी विकायला सुरवात केली. चार सहा वर्षे दर उन्हाळ्यात त्याचा विशिष्ट आवाज 'गुल्फी' हा शब्द म्हणत,सोबतच सायकलला टांगलेल्या घंटीचा आवाज गल्लोगल्ली फिरत होता. काही वर्षांपासून म्हणजेच त्याचे मुले कमवते झाल्यापासून पुंडलिकभाऊ आता घरीच असतो. दोन्ही मुलं सरकारी नोकरीत आहे. सरकारी नोकरीची वानवा असणाऱ्या परिस्थितीत त्याच्या दोन्ही मुलांना नोकऱ्या लागल्या. आज गावकरी म्हणतात, "पुंडलिकभाऊच संचित मुलाच्या कामी आलं. अनेकांनी पुंडलिक भाऊला बुडविल,फसविल मात्र देवाने त्याला व्याजासह परत केलं." आयुष्यभर पुंडलिकभाऊ सरळमार्गाने चालत राहिला. व्यवसायाचे गणित त्याला कधी जमलं नाही मात्र 'माणुसकी' या भांडवलावर त्याने आयुष्यभर इनाम- इतबारे आपला व्यवसाय केला. वास्तविक पुंडलिक भाऊ हा काही एक 'व्यक्ती' नाही तर ती एक 'प्रवृत्ती' आहे जी तुमच्या-आमच्या प्रत्येकाच्या गावांत असते. शहर आणि खेडेगांवात फरक सांगता येतो, गांव समृद्ध असते आणि गावाला 'गावपण' येते ते अश्याच माणसांमुळे..... मुकेश जाधव 9665419402

Thursday, April 28, 2016

20 रुपयात अख्या महाराष्ट्र खिशात....

20 रुपयात अख्या महाराष्ट्र खिशात.... रात्रीचा 1 वाजलेला.एसटी औरंगाबाद बसस्थानकात येऊन थांबलेली...मी डोळ्यात झोप धरून आहे.त्याच अवस्थेत एका वाक्याने माझ्या झोपेलाही ढील दिली.वाक्य होत ...प्रवासी बंधुनो लक्ष द्या...20 रुपयात अख्या महाराष्ट्र खिशात बसवा....मी म्हटलं हे काय नवीन भलतच...त्याच कुतुहलाने झोपेला आवरत डोळे उघडले.मग संपूर्ण चित्र स्पष्ट झाले.एक मनुष्य हातात 5 -10 डायर्या घेऊन डायरी विषयी माहिती सांगत होता...डायरीत मुख्यमंत्र्या पासून प्रत्येक मंत्रांच्या कार्यालयाचे दूरध्वनी,मंत्रालयातील प्रत्येक विभागाचे दूरध्वनी क्रमांक,महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी,एसपी कार्यालय,सरकारी हॉस्पिटल चे पत्ते व दूरध्वनी क्रमांक,प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांचे पिनकोड,एसटीडी कोड...शिवाय जिल्ह्यातील तीर्थस्थळे, मंत्र्यांची नावे,त्यांचे खाते,जिल्ह्याचे पालकमंत्री यासारखे सामान्य ज्ञान ही...आणि सर्वात महत्वाचे म्हणजे A to Z अशी पत्ते व दूरध्वनी साठी पानांची रचना...अस बरच काही... सामावलेल होत. हे सार सांगितल्यावर त्याची ‘पंचलाइन’...20 रुपयात अख्या महाराष्ट्र...ही एका विशिष्ट आवाजात कानावर पडतच होती.अनेकांनी त्याच्या या जाहिरात कलेच कौतुक करत त्याच्याकडून डायर्याह विकत घेतल्या आणि मी मात्र त्याच्याकडून काही प्रश्न फुकट घेतले.... ‘थेअरी’ व ‘प्राक्टिकल’ मध्ये प्रचंड अंतर ठेवणार्याप आपल्या शिक्षण व्यवस्थेतील कोणत्या महाविद्यालयात तो एवढी चांगली जाहिरात कला शिकला असेल? दुसर्याल क्षणाला वाटले हा एक निरर्थक प्रश्न...म्हटलं याचा शोध घेणेही व्यर्थ... ‘जीवन’ नावाच्याच महाविद्यालयान त्याला हे शिकविले असेल.परिस्थिती माणसाला शिकविते हे खरच...आणि हेच त्याच उत्तर. आपणच विचारत जावे प्रश्न अन आपणच शोधावी किंवा द्यावीत उत्तरे... ‘परिक्षार्थी’ आणि ‘उत्तरार्थी’ एकच...ही एक वेगळीच परीक्षा...हा एक पाठशिवणीचा खेळ... मघाशीच मोबाइल मध्ये डोकावलो होतो.वेळ रात्रीचा एक...परत एक विचार...याच्या घरी बायको –पोर झोपलेली असणार..हा त्यांच्यासाठी ,हितभर पोटासाठी रात्रीचा संघर्ष करीत असेल..मग रात्रीचा दिवस करणारे पुण्यातील रिक्षावाले,रात्रपाळी करणारे कामगार,गोरखा,सेकूरेटी गार्ड,दिवसा वीज नसल्याने रात्री पिकांना पाणी देणारे शेतकरी डोळ्यासमोर येत गेले. सार जग झोपलेल..आणि यांचा मात्र रात्रीचा दिवसासाठी एक संघर्ष...पोटाची खळगी भरण्याची ही धडपड...मग याला पांढरपेशा समाजाच्या भाषेत ‘कष्ट’ म्हणायचे कि त्यांची ‘अगतिकता’...हा परत एक प्रश्न... पण हे कोण समजून घेणार ? आणि कशासाठी समजून घेणार ? जाणिवाच हरवलेल्या समाजासाठी हे सारे निरर्थक प्रश्न...आपणही त्याच गर्दीतले...पण आपण विचार तरी करतो त्यांच्याबद्दल ...परंतु फक्त विचार करून काय फायदा ?....हा परत एक प्रश्न. हे पण खरंच. या प्रश्नाच उत्तर आपल्याकडे नाही...आपली उत्तरपत्रिका कोरीच आहे....

Tuesday, January 27, 2015

एक संशोधन...

संशोधनाची पार्श्वभूमी :- आम्ही जिवलग मित्रांनी एकमेकांना दिलेला अनुभव... संशोधनाचा विषय :- कार्यव्यस्तता (Busy) व मित्रांशी संवाद यातील सहसंबंध –एक अभ्यास... गृहीत (Hypothesis) :- कार्यव्यस्ततेमुळे मित्रांशी संवाद कमी होतो. सद्यस्थितीत आपण एकमेकांना कार्यव्यस्ततेचा अनुभव देत असतो.Busy हा तर आपणच परावलीचा शब्द केला आहे.आपल मोबाइल वरील hallo नंतरच पहिलं वाक्य असत ‘Busy आहेस का’ ?यातून समोरच्या व्यक्तीच्या कार्यव्यस्ततेचा आपण आदर करतो हे आपल्याला ‘सुचवायच’ असत की त्याला ‘सुखवायच’ असत,हे माहीत नाही.परंतु हा अनुभव प्रत्येकाकडे जमा आहे.....सकाळी 7 वाजता सुरू झालेला आपला दिवस...प्राथमिक विधी..अंघोड पाणी...तयारी साठी 1 तास..संपूर्ण दिवसाचा जेवणाचा कालावधी 1 तास ..कार्यस्थळी वेळ येणे –जाणे सह जास्तीत जास्त 10 तास...झोप 8 तास... उरलेले 4 तास...प्रत्येकाचा दिवस 24 तासांचा आणि अपेक्षा तरी काय मिनिट...दोन मिनिट संवादाची...आपण घेतलेल्या अनुभव,सुख-दुख,आनंदाच्या वाटाघाटीची....खरच आपण कार्यव्यस्त असतो का ? निष्कर्ष :- ...घंटा...

Tuesday, January 6, 2015

दुर्गभ्रमण गाथा....

एखाद्या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट न देता त्या ठिकाणाला कडकडून भेटता येईल का?तुमच्या आमच्या लेखी या प्रश्नाच ‘नाही’ असच उत्तर असेल.परंतु ज्या वाचकांनी ‘दुर्गभ्रमण गाथा’ अनुभवलेली आहे ते मात्र या प्रश्नाला ‘दुर्गभ्रमण गाथा एकदा तरी हाती घ्या’एवढ्याच शब्दात उत्तर देतील!!! नुकतच गो.नि.दांडेकरांच ‘दुर्गभ्रमण गाथा’ वाचुन हातावेगळे केले. ‘हातावेगळे केले’ या शब्द प्रयोगापेक्षा ‘हातावेगळे झाले’ म्हणणे अधिक न्यायदर्शक...कारण दुर्गभ्रमण गाथेत गड किल्ल्यावरील शब्दांची नजाकत ऐवढी सुंदर आणि अप्रतिम की पूर्ण वाचल्याशिवाय स्वस्थता नाही... ४५० पानांची ही दुर्गभ्रमण गाथा...गाथेत गोनिंदा आपल्या सिद्धहस्त लेखणी सामर्थ्याने शिवाजी राजांचा वारसा सांगणार्याग किल्ल्यांच जिवंत चित्रण डोळ्यासमोर उभ करतात.या प्रत्येक किल्ल्यानं आपल ऐतिहासिक महत्व,वैशिष्ट अन वेगळेपण राखून ठेवलय.... किल्ल्यांच्या अवतीभवतीची समाज संस्कृती...त्या किल्ल्यांची ऐतिहासिक-भौगोलिक पार्श्वभूमी...किल्ल्यांला जाणार्यात धुळवाटा,कडा-कपारी,घाट,खिंडी...रस्त्याने लागणारा ऋतु प्रमाणे कधी मुसळधार पाऊस,कधी रन-रनत ऊन तर कधी बोचरी थंडी अन त्यासोबत गर्द धुक ही...पर्वतरांगांच्या दर्याा खोर्या तुन वाहणार्या् नद्या-नाले आणि त्यांच तहान भागविणार,थकवा दूर करणार शीतल जल...जंगलातील साद घालणारे पशू पक्षी...किल्ल्यां वरून नजरेत भरणारा विस्तीर्ण प्रदेश, जल अस्तित्व दाखविणार्यां नद्या-धरणे...ढगांच्या कुशीत होत जाणारा सूर्यास्त...नक्षत्रांच्या संगतीत किल्ल्यावर घालवलेली चांदणी रात्र...भल्या पहाटे हळूहळू होत जाणारा सूर्योदय...किल्ल्याच कल्पनेपलीकडील भव्य दिव्य प्रवेशद्वार...पाण्यांची हौद,तलाव,खोगिर,तोफ,दारूगोळा,गुढ असणारी भुयारं...किल्ल्यांची तटबंदी,बुरूज,पडके चौथरे,ढासळलेला राजप्रासाद,भग्न अवस्थेतील राहती ठिकाण..आपल्या पूर्वजांच्या समाध्याचे खिन्न करणारे अवशेष....वृक्षछायेत असणारी देऊळे अन त्यातील पुरातन मुर्त्या...आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधतात.खरच गोनिदांच्या लेखन शैलीला तोड नाही. ऐकिव नसलेला शब्द गवसणे अन तो अलगत वेचून घेणे यातील समाधानाची अनुभूती भ्रमण गाथेत ठिकठिकाणी मिळत जाते. ‘भराटवारा’, ‘मेघडंबरी’, ‘गोमेद’, ‘खारवा’, ‘कडाबिनी’, ‘एलोरी’......अशा कितीतरी शब्दवैभवांनी भ्रमणगाथा सजलेली आणि समृद्ध झालेली आहे.मला यात सर्वात भावलेला शब्द तो ‘कुमारी वाटा’. .... “राजुर ला आम्ही इगतपुरी-संगमनेर महामार्ग सोडला,अन त्या कुमारी वाटेला लागलो.कुमारी वाट म्हणजे जिथवर नागरी संस्कृतीचा संस्पर्श अद्यापवरि झाला नाही.जिथवर खाली पडलेल्या शेणाच्या पोटयाचही मोल घ्यायचं असत ही नागरी शहाणीव अजून पोंचली नाही.’’ गोनिदांनी कुमारी वाटेच केलेले हे वर्णन त्यांच्या निरीक्षण दृष्टीची एक छोटीशी झलकच... दुर्गभ्रमण गाथा’ आपल्या झोळीत काय देते? आजच्या व्यवहार्थ जगात नफ्या-तोट्याच्या तराजू तील हा एक महत्वाचा प्रश्न.धावपळीच्या या आयुष्यात आपण एखाद्या ठिकाणाला भेट देतो,मजा मस्ती करतो,आनंद लुटतो अन परत येतो परंतु यापलीकडे त्या ठिकाणचा इतिहास,ते ठिकाण,त्या ठिकाणची माणस आपल्याशी काहीतरी बोलू पाहताहेत,हे आपण लक्षातच घेत नाही म्हणूनच एखाद्या ठिकाणाशी कस वागाव,त्याच्याशी हितगुज कशी करावी याचा परिपाठ....त्या ठिकाणच्या लोकांचं जगणं अनुभवण्याची शिकवण....आपल्या पूर्वजांची आठवण,त्यांनी आपल्या हाती दिलेला हा अमूल्य ठेवा,त्या ठेव्याची जपवणूक करण्याच भान....राजांनी स्वराज्या साठी उपसलेले कष्ट..राजांची प्रेरणा,स्फुर्ती,दूरदृष्टी... गोनिदांची राजांप्रती,किल्ल्यांप्रती असणारी समर्पित वृत्ती....आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पैशांच्या बाजारात विकत न मिळणारा अभिजात कलाकृतीचा ‘निर्लेप अन निखळ आनंद’....या सर्वांनी ‘दुर्गभ्रमण गाथा’ आपली झोळी ‘श्रीमंत’ करते... ‘पाणी’ सुद्धा विकत मिळणार्या् या दुनियेत अजून काय हवे..?????

Monday, December 8, 2014

जयकर....

नागपूर ला येऊन खूप दिवस झाले तरी नागपूर विद्यापीठाला अजूनपर्यंत भेट दिली नव्हती. काल परवा प्रथमच नागपूर विद्यापीठात गेलो होतो.प्रथम भेटीत प्रेमात पडाव अस नागपूर विद्यापीठ मुळीच नाही,कारण ही त्याला सहज सांगता येईल.विद्यापीठाचे विविध विभाग शहराच्या वेगवेगळ्या भागात विखुरलेले आहे म्हणजे एक एकीकडे अन दुसरा भलतीकडे...विद्यापीठाची मेन बिल्डिंग रविनगरच्या अमरावती रोड ला...लायब्ररी नॉर्थ अंबाझरी रोड वर...परिक्षा विभाग भारत नगर च्या एलआयटी मध्ये..तर विद्यार्थी हॉस्टेल रविनगर स्कोअर ला...त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.वेळ ,पैसा ,श्रम खर्च झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या तोंडून न कळत विद्यापीठाबाबत म्हणजेच व्यवस्थेबाबत वैदर्भिय अपशब्द बाहेर येतात.(कधी कधी आपण अपशब्द उच्चारण्या पलीकडे काही करू शकत नाही....) एका मित्राच्या नेट परीक्षेच्या फॉर्म चे सबमिशन करणे हे माझ्या विद्यापीठ भेटीच निमित्त होत.या विद्यापीठाचा तीन चार ठिकाणाचा तमाशा पूर्व माहित असल्यामुळे आणि आपली गैरसोय टाळावी म्हणून मी अगोदरच माझ्या मित्रांकडून फॉर्म नेमक्या कोणत्या ठिकाणी सबमिट करावा याची माहिती घेतली होती. त्यांनी सांगितल्यानुसार ‘भाऊसाहेब कोलते लायब्ररी’त फॉर्म जमा करण्यासाठी जायचं होत.चौकातील एका रिक्षावाल्या काकांना म्हणालो “भाऊसाहेब कोलते लायब्ररी जाना है I ” क्षणभर विस्मयाने माझ्याकडे पाहत त्यांनी मलाच विचारले “कहा है?” “झाशी राणी चौक के आगे..”... मी. “चालीस रुपये लगेंगे”...काकांनी रिक्षा सुरू करत भाडे वाक्य माझ्या कानावर फेकल.मी हो म्हणत.. आमची रिक्षा भाऊसाहेब लायब्ररी चा शोध घेत झाशी राणी चौकाकडे धावू लागली. मध्यंतरी काकांच्या प्रतिप्रश्नाने मला उमजले होते की,या काकांना सुद्धा ही लायब्ररी माहित नाही.परंतु काकांना हातच ग्राहक गमवायच नव्हतं आणि माझ्या जवळही वेगळा पर्याय नव्हताच.तीन चार व्यक्तींकडे विचारपूस करत करत शेवटी आम्ही मोठ्या कष्टाने ‘भाऊसाहेब कोलते लायब्ररी’ शोधून काढली आणि सापडली एकदाची असे भाव दोन्हींच्या चेहर्या वर प्रगट झाले.पैसे देतांना रिक्षावाले काका म्हणाले “अगलेसे यूनिवर्सिटी लायब्ररी बोलना...भाऊसाहेब कोलते को कोई पहेचानता नही...” डॉ.व्ही.बी.उर्फ भाऊसाहेब कोलते...नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू...2000 मध्ये नागपूर विद्यापीठाच्या लायब्ररी ला त्यांचे नाव देण्यात आले परंतु अजूनही त्यांच्या नावाने ती लायब्ररी ओळखल्या जात नाही हे नागपूर विद्यापीठाचे दुर्दैव म्हणावे लागेल.... ‘जयकर’ ला सोबत घेऊनच नवीन विद्यार्थी शक्यतो पुणे विद्यापीठात प्रवेश करीत असतात,म्हणजे ‘जयकर’ हे नाव त्यांना अगोदरच कोठून तरी माहित झालेल असत.म्हणूनच जयकर ला पाहण्याची उत्सुकता प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात दडलेली असते....पुणे विद्यापीठाच भव्य अस ते गेट..परंतु अवती भवती च्या गर्दीत लपलेल..बाहेरच बाजूला पोलिस चौकी..गेट च्या एका बाजूला विद्यार्थी सुविधा केंद्र..आधी तेथे पीआरओ चे राहते घर होते..तर दुसर्याप बाजूला पीएमटी चा बस स्टॉप...परंतु खरा गोंधळ होतो ते समोरील डाव्या,उजव्या बाजूचे दोन रस्ते पाहिल्यावर...तेथे कोणता रस्ता धरावा हा प्रश्न निर्माण होतो.उजव्या बाजूने हॉस्टेल ऑफिस,नवीन बांधलेल कॉमर्स डिपार्टमेंट...क्लास रूम कॉम्प्लेक्स ...हेल्थ सेंटर ..गणित विभाग...समोरच ओपेन कॅंटीन..खेर वाड्मय भवन करत विद्यापीठाची मेन बिल्डिंग...तर डाव्या बाजूने म्हणजेच पोलिस चौकी कडून पर्यावरण शास्र..बॉटनी..झुऑलजी डिपार्टमेंट करत जयकर च्या भव्य बिल्डिंग चे दर्शन होते.जयकर ला जाण्यासाठी हाच मार्ग सोईचा आहे. ‘जयकर’ ला पहिल्यांदा भेटल्यावर कोणत्या भावना मनात येतात?प्रत्येक विद्यार्थ्यासाठी याची उत्तरे निरनिराळी...जयकर ची परिभाषा कशी करावी ?याचेही उत्तरे प्रत्येकासाठी वेगवेगळीच...जयकर फक्त ‘ग्रंथालय’ आहे का ? की पाचशे-हजार विद्यार्थ्यांना सामावून घेणारी अभ्यासिका आहे?असे प्रश्न जयकर च्या विद्यार्थ्यासमोर उपस्थित केले तर त्याची येणारी उत्तरे जयकर ला ‘ग्रंथालय’ वा ‘अभ्यासिका’ म्हणून सीमित करू शकत नाही.एवढ जयकरच अन येथील विद्यार्थ्यांच भावनिक नात निर्माण झालेल असत.म्हणूनच येथे येणार्यान प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी जयकर फक्त ग्रंथालय किंवा अभ्यासिका राहत नाही तर त्यांच्या भावविश्वातील एक ‘श्रद्धास्थान’ असत... विद्यापीठात आलेला प्रत्येक विद्यार्थी ध्येय,स्वप्न जवळ बाळगून असतो.विद्यापीठातील भरावलेल वातावरण..नवीन नवीन अभ्यासाचा जोश..त्याला जयकरच्या अभ्यासी वातावरणाची सोबत...म्हणूनच विद्यार्थी जागेसाठी सकाळी सहा पासूनच जयकर ला गर्दी करतात.सुरवातीला सार काही सुरळीत सुरू असत म्हणजे अभ्यास एके अभ्यास..फक्त जयकर आणि आपण..कारण कुणी फारसं परिचयाच नसत.परंतु कालांतराने ओळखीचे चेहरे होतात..चेहर्यां ची ओळख होते आणि येथूनच जयकर ची व आपली ‘दोस्ती’ जुनी होत जाते...जयकर खर्यार अर्थाने कळत जाते...विद्यार्थ्यांचे अनेक प्रकार नकळत लक्षात येतात..सकाळ पासून रात्री पर्यंत अभ्यास करणारे विद्यार्थी...एक वेळच जेवणारे विद्यार्थी...सकाळी जयकरला बॅग ठेवल्यावर रात्रीच बॅग घेऊन जाणारे विद्यार्थी...अधून मधून जयकर ला भेट देणारे विद्यार्थी...सुरवातीला आपल्या ‘वर्गमैत्रिणीची’कालांतराने ‘गर्लफ्रेंड’ची जागा सांभाळणारे विद्यार्थी...गर्लफ्रेंड शोधणारे विद्यार्थी...(आमच्या एका मित्राच्या मते फुकट पेपर वाचणारे विद्यार्थी...) डाव्या उजव्या मताचे...समाजवादी..हिंदूत्ववादी ...फक्त नेट –सेट करणारे..फक्त नेट देणारे..फक्त सेट देणारे...तर काही फक्त यूपीएससी करणारे...काही फक्त एमपीएससी करणारे ...बहू अधिक दोन्ही चान्स घेणारे..काही फक्त बँकिंग चाच अभ्यास करणारे असे एक ना अनेक...यादरम्यान आपल एक आखीव –रेखीव टाइम टेबल तयार होत जात.सकाळी ६-७ ला जयकर ला भेट...बॅग ठेवून ‘अनिकेत’ मध्ये चहा-नाश्ता,९ वाजता पेपर साठी परत अनिकेत कडे..मग पेपर वाचन..अभ्यास...१२.३० ला जेवणासाठी जयकर च्या खाली..१.३० ला परत जयकर..थोडीशी झोप...परत अभ्यास...सायंकाळी ५ वाजता चहासाठी ‘अनिकेत’ किवा ‘ओपेन’ कडे...दरम्यान ठेका घेतल्यासारखे गल्ली पासून दिल्लीच्याही पुढील जागतिक विषयावरील त्या विषयातील तज्ञ समजून चर्चा..६ ते ८.३० जयकर..मग रात्रीच जेवण...परत रात्री ११पर्यंत जयकर...यातून आपल्यातील बदल आपल्यालाच कळत जातो. जयकर ची स्वतची अशी काही वैशिष्ट्ये आहे.काही विद्यार्थ्यांना जयकर लवकर पावत.काही विद्यार्थ्यांना जयकर लवकर पावत नाही किंवा पावतच नाही.अस असल तरी जयकर कधीही कोणत्याही विद्यार्थ्यांची ओंजळ रिकामी ठेवत नाही.जीवन जगण्यासाठी विविध समृद्ध अनुभवाची शिदोरी त्यांच्या सोबत देतच असते.ती शिदोरी आपल्याकडून कोणी हिरावून घेवू शकत नाही म्हणूनच येथील विद्यार्थ्यांच्या जीवनात जयकर ला ‘पंढरी’ चे स्थान आहे. आजही एमपीएससी,यूपीएससी,नेट-सेट चे निकाल लागतात तेव्हा विद्यार्थी एकच विचारतात, ‘जयकर’ चे किती विद्यार्थी पास झाले.यातच ‘जयकर’ चे ‘स्वातंत्र अस्तित्व’ व ‘स्वातंत्र ओळख’ सामावली आहे. याठिकाणी प्रत्येक विद्यार्थी पुण्यात येवू शकणार नाही आणि ‘जयकर’ चा लाभ घेवू शकणार नाही ही बाब सुद्धा आपण प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे म्हणूनच महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांमध्ये ‘जयकर’ सारखी वातावरण निर्मिती होणे अत्यंत आवश्यक आहे॰ येथे ‘जयकर’ ची थोरवी सांगणं हा उद्देश मुळीच नाही.परंतु इतर विद्यापीठांमध्ये आपण ‘जयकर’ निर्माण करू शकलो नाही,ही खंत मात्र नक्की आहे...

Tuesday, September 30, 2014

एका सायकलचा प्रवास....

मोटार सायकल रस्त्यावरून धावण्यापूर्वी ‘सायकल’ ला चार चाकीचा सन्मान होता. ज्यांच्याकडे सायकल असायची त्यांची गणना मध्यमवर्गीय श्रीमंत गटात व्हायची म्हणजेच श्रीमंतीचा ‘अंगणात सायकल’ हा पण एक निकष असायचा.आज लोक टू व्हीलर, फोर व्हीलर ची जी काळजी घेतात तीच काळजी त्यावेळेस सायकलची घ्यायचे.घरातून बाहेर पडतांना सायकल कपड्याने चकाचक व्हायची.सायकल च्या टायर मधील हवा तसेच सायकल चे ब्रेक ही तपासले जायचे.आठवड्यातून एकदा तरी ओइलिंग आणि सायकल वर पाणी पडायचे.काही छंदींच्या सायकलला तर आरसा अन रेडियम च्या प्लेट्स ची सजावट पण असायची.सायंकाळी रस्त्यावरून अनेक सायकली धावतांना दिसायच्या.सायकली चा एक वेगळाच मिजास होता.पुण्याची तर ‘सायकली’ चे शहर अशीही एक ओळख होती.त्याच पुण्यातील एका सायकलीच्या प्रवासाची ही गोष्ट.... पुणे विद्यापीठ म्हणजे हुशार,गरीब,होतकरू विद्यार्थ्यांचा गोतावळा.महाराष्ट्राच्या काण्या –कोपर्याबतुन हे विद्यार्थी कुणाच्या तरी मदतीने आणि कुणा कडून तरी प्राप्त ऐकिव माहिती वर शिक्षणाची भूक भागविण्यासाठी ,ध्येयप्राप्तीचे स्वप्न घेऊन विद्यापीठात ढेरेदाखल होतात.अशा विद्यार्थ्यांना आजही ‘सायकल’ हे वेळ व पैशाची बचत करणार आनंदाचे एक साधन वाटतं ,म्हणून अनेक विद्यार्थी विद्यापीठात व कामानिमित्त पुणे शहरात सायकल वरून फिरतांना दिसतात. दिपक जाधव हा मूळचा सोलापूरचा.सोलापूरच्या ‘वालचंद’ चा विद्यार्थी. घरची परिस्थिती बेताचिच म्हणजे गरीबीची व्याख्या शिकण्याची कधी त्याला गरज पडली नाही,आतापर्यंत तो ती अनुभवत आला होता.बी.ए ला असतांनाच प्रा.नीला सरानी पुणे विद्यापीठाबद्दल बरच काही सांगितले होते. म्हणूनच एम.ए करायचे ते पुणे विद्यापीठातूनच हे त्याचं बी.ए ला असतानाच ठरलेल. त्यानुसार तो राज्यशास्र विभागात एम.ए ला प्रवेशित झाला. राज्यशास्र विभाग विद्यापीठातील एक नावाजलेला विभाग.विद्वान प्राध्यापक आणि चळवळी विद्यार्थी यामुळे राज्यशास्र विभागाचे एक वेगळेच वलय विद्यापीठात आहे.सुरवातीला सार काही नवीन वाटते परंतु लवकरच कमवा शिका,विभाग,लेक्चर,जयकर,तात्विक चर्चा,अनिकेत,ओपन,आदर्श,ऐलीस गार्डन हे पुणे विद्यापीठातील विद्यार्थाच्या अंगात भिनत जाते आणि यातच पुणे विद्यापीठाचे वेगळेपण दडलेले आहे. विद्यापीठात त्यावेळी वेगवेगळ्या कारणांसाठी विद्यार्थी आंदोलन करत,उपोषणाला बसत.कधी एम.फील-पी.एच.डी च्या विद्यावेतनाबाबत,कधी होस्टेल बाबत,कधी रिफेटरी,कॅंटीन च्या भाववाढीबाबत तर कधी नेट सेट च्या प्रश्नाबाबत...त्याच्या सोबतीला सिनेट मधील चर्चा,विभागातील विविध विषयांवरील चर्चासत्रे,विद्यापीठात साजर्यार होणार्याा जयंत्या आणि पुण्यतिथी,या सर्व घटनांना पत्रकारांच्या माध्यमातून वर्तमानपत्रात,माध्यमात प्रसिद्धी मिळायची.त्यामुळे एलेक्ट्रोनिक मेडिया,माध्यम,पत्रकारिता,पत्रकार हे शब्द खूप वजनदार वाटायला लागले.या सर्वांचा परिणाम म्हणजे ‘मेडिया’ हे एक बदलांचे ‘वलयांकित’ माध्यम आहे याची प्रथमच प्रकर्षाने जाणिव झाली,त्या जाणिवेतून दिपक सारखे अनेक मित्र पत्रकारितेकडे वळले. पुणे विद्यापीठाच जर्नलिज्म,थेट विद्यापीठाच्या बाहेर एफसी रोड वरील रानडे इंस्टीट्यूट ला.साहजिकच पीएमटी ने पुणे विद्यापीठ ते म्हसोबा गेट जायचं आणि म्हसोबा गेट पासून पायी ‘रूपाली’, ‘वैशाली’ करत करत रानडेला पोहचायचे.यासाठी पीएमटी हा बेस्ट पर्याय परंतु त्यातील मुख्य अडचण म्हणजे पैशांची,म्हणूनच दिपक व त्याच्या मित्रांनी सायकलची व्यवस्था केली.पुणे विद्यापीठ ते रानडे हा नित्य नवीन अनुभव देणारा रोजचाच प्रवास त्यातून सुरू झाला.या मित्रांना जातांना फारसं काही वाटायचे नाही कारण जातांना उतारचा मार्ग परंतु येतांना मात्र त्यांची चांगलीच दमछाक व्हायची.त्यामुळे ते कधी कधी ज्ञानेश्वर पादुका चौकातून वरच्या मार्गाने सेनापती बापट रस्त्याला किंवा सिम्बिओसिस,गवर्नमेंट पोलिटेक्निक कडून विद्यापीठ गाठायचे.या प्रवासातून अन त्यांनी घेतलेल्या कष्टातून त्यांच्या पदरात पत्रकारितेची पदविका पडली.त्या आधारावर ते ‘पत्रकार’ म्हणून कार्यरत झाले. दिपक ‘पुढारी’ला जॉइन झाला आणि त्याने ठरविले की,आपली सायकल आपल्या सारख्याच गरीब व होतकरू विद्यार्थ्याला वापरायला द्यायची पण ती एका अटीवर,ती म्हणजे त्या विद्यार्थ्याने सुद्धा सायकल चा वापर झाल्यानंतर दुसर्याय विद्यार्थ्याला ती वापरायला द्यायची.अशा प्रकारे दिपक च्या सायकलचा प्रवास एका हातून दुसर्यात हाती सुरू झाला.परंतु दुर्दैवाने जो मित्र ही सायकल वापरत होता त्याने ‘पत्रकार भवना’ जवळ ही सायकल ठेवली असतांना तेथून ती चोरीला गेली.परंतु ही झाली अपवादात्मक गोष्ट.आपल्याजवळ सुद्धा पुस्तके,रजिस्टर,इलेक्ट्रोंनिक साधने,कपडे,पादत्राणे,फर्निचर,टेबल लॅम्प ,सायकल,बॅग….यासारख्या अनेक वस्तु असतात की ज्या आपली गरज संपल्यावर दुसर्यां्च्या उपयोगी येणार्याे असतात.परंतु अनेकदा ह्या वस्तु आपल्याजवळ धूळ खात पडून असतात म्हणजेच आपल्याकडून दुसर्यांेच्या गरजांचा फारसा विचार होताना दिसत नाही. ‘विंदा’ ची देणार्याणने देत जावे....ही आमची मुखपाठ....परंतु कृतीत मात्र येत नाही. वस्तूंच्या या प्रवासामध्ये मात्र एक काळजी असावी.तेथे फक्त ‘एकमेकांच्या गरजपुर्तींचा’ निखळ आनंद असावा.मान-अपमान,अहंकार,गरीब-श्रीमंत यासारख्या भावनांचा तेथे लवलेशही नसावा,म्हणजे तो ‘देण्या-घेण्याचा व्यवहार’ ठरत नाही. आपल्याजवळ असणार्याह वस्तूंना सुद्धा असा प्रवास करता येईल का ???...

Wednesday, September 10, 2014

चित्र ....

ग्रामीण भागात काही वर्षांपूर्वी दिसणार एक चित्र...अनेक घरात घरातील लोकांपेक्षा गुरं ढोर अधिक असायची.गावातील पहाट गुराढोरांच्या हंबरण्याने व्हायची.घरातील कर्ता गुराढोरांच्या चारा पाण्यासाठी 'वाडया' ची वाट धरायचा..शेण पाणी करायचा.या गुराढोरांची भाषा ही त्याला माहीत होती... शेणामातीलाही सुगंध असतो हे नेहमी शेणा मातीचे हात असणार्याच त्या शेतकर्यांोना वेगळे काय सांगायचे होते...पशु धनाला त्यावेळेस प्रतिष्ठा होती,सन्मान होता...म्हणजेच शेतीचे 'आधुनिकीकरण' व 'यांत्रिकीकरण' व्हायचे बाकी होते.... .....पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणार्याी गुराढोराची नदी,नाले,धरणे यामधून मनसोक्त आंघोळ...नंतर बाजारातून आणलेल्या नवीन दाव,नाथ,मोरखी,बाशिंग,घंटी,घुंगरू,झुल,गोंडे,गेरू,बेगड, रंग,फुगे,काकड्या यांनी त्यांची सजावट...मग संध्याकाळी पोळ्यात जाण्याआधी पुजा...पोळा फुटल्या नंतर प्रत्येक घरी पुरण पोळी...त्यानंतर आराम...वर्षभरातील त्यांचा हक्काचा,आनंदाचा अन आरामाचा एकमेव दिवस....पोळा.... .....शेतकर्यांसचा सर्वांगीण विकास करण्याच्या ,उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या उदात्त हेतूने शेतीचे 'आधुनिकीकरण' व 'यांत्रिकीकरण' करण्यात आले आहे.त्यामुळे पशूंची जागा यंत्राने घेतली.'कारण - परिणाम' हा चर्चेचा मुद्दा नाही....पण आनंदाचे चित्र मात्र बदललेले आहे...लहान मोठ्या शहरात 'बैला' ला पाहायला गर्दी होते..आजच्या या चित्राला काय म्हणावे ..???